सुसंस्कृत समाज जिवंत ठेवण्यासाठी निसर्ग आणि माणूस समजून घेण्याची गरज — प्रा मनोज बोरगावकर !

सुसंस्कृत समाज जिवंत ठेवण्यासाठी निसर्ग आणि माणूस समजून घेण्याची गरज —- प्रा मनोज बोरगावकर!
——————————————–
नांदेड (रत्नाकर महाबळे) अलीकडच्या काळात माणसामाणसातील संवाद दुरावला आहे त्यामुळे माणसांच्या मनात मोठ्या प्रमाणात दरी निर्माण होत आहे. जाती, धर्म ,वंश , राजकीय पक्षात माणसे विभागली गेली आहेत . त्यामुळे प्रत्येक माणूस एकमेकाजवळ येण्यापूर्वी जात आणि धर्म शोधून पाहत आहे. परिणामी एक सुसंस्कृत समाज काळाच्या पडद्यावर जातो की काय अशी भीती निर्माण झाली असल्याने समाज जिवंत ठेवण्यासाठी निसर्ग आणि माणूस वाचण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे असे मत प्रा. मनोज बोरगावकर यांनी व्यक्त केले . बिलोली येथील आनंद मंगल कार्यालयात पार पडलेल्या १९ व्या लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ समाजसेवक माधवराव पाटील शेळगावकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागतअध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे यांच्यासह माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गोपाळराव कदम , देविदास फुलारी , निर्मल कुमार सूर्यवंशी , दत्ता डांगे, डॉ. राम जाधव, यशवंत चव्हाण ,उमाकांत गोपछडे ,नारायणराव पाटील सावळीकर , सुदेश आर्लेकर,माधव फुलारी, चंद्रशेखर सावळीकर, माधवराव चुकेवाड , यादवराव तुडमे , जमुनाबाई खंडेराय , क्रांती वडजे बालाजी तुमवाड, बाबुराव उपलवार, प्रकाश पोवाडे , संतोष तळेगावे, मंगलाताई फुलारी आदींची उपस्थिती होती.
संमेलनाचे प्रास्ताविक संयोजक ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांनी व्यक्त केले . संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.गोपाळ चौधरी यांनी केले. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडी , ग्रंथ प्रदर्शन आणि साहित्यिकांच्या माहितीपर चित्र प्रदर्शनाने करण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. मनोज बोरगावकर म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे मी गर्भात असतानाच जात गाढून आलो आहे .जातीयतीच्या परिघाच्या पलीकडे जाऊन माणूस समजून घेणे आणि त्याला जपणे नितांत गरजेचे आहे . जोपर्यंत आपण माणसे जपणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणुसकी टिकणार नाही असे सांगतानाच मनोज बोरगावकर म्हणाले की, अशा छोट्या छोट्या साहित्य संमेलनाची गरज आहे . अशा साहित्य संमेलनातून येणाऱ्या पिढी समोर वाचन संस्कृती ठेवता आली पाहिजे. त्यांच्यासमोर निसर्ग आणि माणूस ठेवता आला पाहिजे आणि हे काम करण्याची जबाबदारी प्रत्येक साहित्यिक आणि आयोजकांवर निश्चितपणे आहे . यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. नदिष्ट कादंबरीमुळे मला भारतभर मानसन्मान मिळाला परंतु आज मिळालेला सन्मान हा सर्वोच्च आहे. मला वांचीतांवर काही लिहिता आले याचे समधन आहे त्यामुळे शोषित वंचितांचे साहित्य मोठ्या प्रमाणात पुढे आले पाहिजे आणि हेच खरे साहित्य आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर दुपारच्या सत्रात राम तरटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कथाकथन सत्रात प्रा.स्वाती कान्हेगावकर आणि मान्यवरांच्या कथानी श्रोत्यांची दाद मिळवली. प्रसिद्ध कवी प्राध्यापक महेश मोरे यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. कथाकथन सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक धाराशिव शिराळे यांनी तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन पंडित पाटील बेरळीकर यांनी केले.


