मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर आंदोलन ; पाच तास वाहतूक ठप्प !

मराठा आंदोलकांचे राष्ट्रीय महामार्ग ३६१वर आंदोलन : पाच तास वाहतूक ठप्प !
——————————————
पारडी गावात १००फूट उंच टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन
धावरी -रायवाडी -गावात जाम
—————- ——————–
लोहा( रत्नाकर महाबळे)
मराठा आंदोलनाची धग गावोगावी अधिक तीव्र झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग ३६१वर पारडी येथे आंदोलकांनी रस्ता जाम केला जवळपास पाच तासाहून अधिक काळ या मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली तर अन्य मार्गाने वाहने जात होती पण छोटया छोटया गावात रोडवर दगड-लाकडं टाकून रस्ता अडविण्यात आले होते.पारडी गावात जवळपास शंभर फूट उंचीच्या टॉवरवर जाऊन मराठा आंदोलकानी जोरदार घोषणा बाजी करत आरक्षणाची मागणी केली.तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या विनंती नंतर आंदोलन स्थगित झाले व वाहतुकीची कोंडी फुटली
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची लोहा शहर व तालुक्यात तीव्रता अधिक वाढली आहे .सोमवारी दुपारी एक वाजल्या पासून राष्ट्रीय महामार्ग ३६१ तुळजापूर ते नागपूर या रोडवर नांदेडकडे जाणाऱ्या पारडी गावाजवळ आंदोलकानी रस्ता जाम केला त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली पाच तासाहून अधिक काळ आंदोलकांनी रस्ता जाम केला होता. त्यामुळे तुळजापूर -नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग लोहा -नांदेड रोडवर पारडीजवळ ठप्प झाला होता
याच गावात जवळपास शंभर फूट उंच टॉवर वर जाऊन आंदोलकांनी घोषणा बाजी केली व आरक्षण देण्याची मागणी केली.शोले स्टाईल आंदोलन जवळपास पाच तास सुरू होते स्वतः तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व टॉवर वरून खाली येण्यासाठी विनंती केली त्यामुळे सायंकाळी आंदोलन स्थगित झाले व राष्ट्रीय महामार्ग ३६१ पूर्ववत सुरू झाला
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याचे कळताच खेडेगावातही रोड अडविण्यात आले तरुणांनी गावातून लोहा शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर दगडधोंडे भलीमोठी लाकडे टाकून रस्ता जाम केला तर काही ठिकाणी टायर जाळून आग करण्यात आली होती
बेमुदत बंद ची हाक
———————-
लोहा शहरातील शैक्षणिक संस्था सोमवारी बंद होत्या मंगळवारपासून शहरात बेमुदत बंद ठेवण्यासाठी तहसीलदार यांना आंदोलकांनी निवेदन दिले आहे.मेडिकल व रुग्णालय वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद राहतील असं कळविले आहे



