लोहा नगर परिषद पथ विक्रेता समिती बिनविरोध !

लोहा नगर परिषद पथ विक्रेता समिती बिनविरोध !
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियान अंतर्गत लोहा नगर परिषद पथ विक्रेता निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. एकूण आठ जागांपैकी सहा जागा बिनविरोध निवडण्यात आल्या तर दोन जागा रिक्त राहिल्या. निवड झालेल्या उमेदवारांना सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा न. प. चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले .
महाराष्ट्र उपजिविका संरक्षण समिती अर्थात लोहा नगर परिषद पथ विक्रेता समितीच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आठ जागे करिता नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. दि. १६ ऑगस्ट रोजी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आठ पैकी सहा नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले तर नामांकन अर्ज दाखल केले नसल्यामुळे दोन जागा रिक्त रहिल्या. निवड घोषणा होण्यापूर्वीच सर्व सहा उमेदवार बिनविरोध ठरले होते. सदरील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी काम पाहिले तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून न. प. चे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांनी काम पाहिले. दि. ३० रोजी शुक्रवारी दुपारी नगर परिषद कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांच्या हस्ते निर्वाचित उमेदवार दत्तात्रय कांबळे (अनुसूचित जाती), सय्यद सिकंदर (सर्वसाधारण), सोहेल मुस्तफा (सर्वसाधारण), सुमनबाई संगेवार (विकलांग महिला), युनूस नजीर शेख (इमाव), लक्ष्मीबाई नागेश्वर (सर्वसाधारण महिला) आदींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी पालिकेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंजुषा जाधव यांनी यांची उपस्थिती होती.
लोहा नगर परिषदेच्या माजी गटनेते व बांधकाम सभापती
करीम शेख यांनी या निवडणुकीत मोलाची भुमिका घेत बिनविरोध केली रस्त्यावरील पथ विक्रेते यांना शासन स्तरावरुन योजना व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले संघर्ष शहर विकास आघाडी पॅनल तयार केली आणि ते बिनविरोध निवडून यावे यासाठी प्रयत्न केले .यावेळी माजी नगरसेवक शरद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, रिपाईचे तालुका अध्यक्ष सुरेश महाबळे,खरेदी विक्री संघाचे संचालक भिमराव पाटील शिंदे,माजी नगरसेवक नबी शेख ,केतन खिलारे, जेष्ठ नागरिक गंगाधर महाबळे यांनी बिनविरोध पॅनल विजयी झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या.



