महापालिका आणि सत्ताधारी यांच्या बेजबाबदारपणामुळे नांदेडकरांना पाणी टंचाईचा फटका — दत्ता पाटील कोकाटे !

महापालिका आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नांदेडकरांना पाणीटंचाईचा फटका : शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे
——————————————–
नांदेड (रत्नाकर महाबळे )
विष्णूपुरी प्रकल्पातून नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत काही अडचणी आल्यास नांदेड उत्तर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी आसना नदीवर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती मात्र महानगरपालिका प्रशासन ,आयुक्त आणि लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणामुळे नांदेडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . त्यामुळे संबंधितांची हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केली आहे.
नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विष्णुपुरी धरणातून व्यवस्था करण्यात आलेली आहे. नांदेड दक्षिण आणि उत्तर दोन्ही भागाला याच धरणातून पाणीपुरवठा होतो. यापूर्वीच्या टंचाई काळात नांदेड शहराला पाणीपुरवठ्याचा फटका बसू नये आणि नागरिकांना टंचाई भासू नये यासाठी इसापूर धरणातून येणाऱ्या पाण्यावर आसना नदीतून पर्यायी उद्भव व्यवस्था करण्यात आली आहे . येथे दोन टीएमसी पाणी आडवंल जात . त्या पाण्याचा नांदेड शहरांना पुरवठा करण्यात येत होता . अत्यंत अडचणीच्या काळात असणा नदीवरील पर्यायी उद्भव्यवस्थेने नांदेडकरांची तहान भागवली होती. परंतु महानगरपालिकेच्या बेजबाबदार प्रशासनाने आसना नदीवरील पर्यायी उद्भव व्यवस्थेचा वापर केला नाही. तिथे आलेले पाणी वाहून गेले. त्यामुळे आता विष्णूपुरी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्याचे सांगून नांदेड शहरात अघोषित पाणी बंदी लावली आहे . ही पाणीबाणी लावण्यामागे केवळ आणि केवळ आयुक्तांचा बेजबाबदारपणा आणि उत्तराच्या आमदाराचा बेजबाबदारपणा जबाबदार असल्याची टीकाही दत्ता कोकाटे यांनी केली आहे. पर्यायी पाणी व्यवस्था का वापरली नाही याचा जाब विचारणे ऐवजी केवळ फोटो सेशन करून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न विद्यमान आमदाराकडून करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली. नांदेड उत्तरला पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी उद्भव व्यवस्थेचा योग्य वापर केला असता तर आज नांदेड उत्तर मधील लाखो लोकांच्या घशाला कोरड लागली नसती परंतु आमदाराचा नाकर्तेपणा यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे.नांदेडकरांना जाणीवपूर्वक पाणीटंचाईचा फटका देणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचाही कोकाटे जाहीर निषेध केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने नांदेड उत्तरसाठी आसना नदीवर तयार करण्यात आलेल्या पर्यायी उद्भावाचा उपयोग करून निर्माण होणारी पाणीटंचाई तात्काळ दूर करावी अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.


